सोलापूर ; बाळीवेस शक्तीपूजा व समाजसेवा मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येत आहे. भक्तिमय वातावरणात साजर्या होणार्या या उत्सवात आरोग्यसेवा, वृक्षारोपण अशा उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपण्यात येत आहे. यंदाच्या उत्सवातील प्रमुख आकर्षण असलेला ‘रावण वध’ हा आकर्षक हलता देखावा साकारण्यात आला असून हा देखावा भक्तांसाठी आकर्षण ठरत आहे.
या उपक्रमांवेळी मंडळाचे आधारस्तंभ महेश थोबडे, सल्लागार सुधीर थोबडे, ट्रस्टी अध्यक्ष संकेत थोबडे, उपाध्यक्ष सागर हिरेहब्बू, उत्सव अध्यक्ष प्रथमेश थोबडे, सुनील गुंगे, रेवणसिद्ध आवजे, केदार उंबरजे, अजित धुम्मा, प्रतीक थोबडे, सिद्धेश थोबडे, निखिल थोबडे, उत्सव उपाध्यक्ष बसवराज अमणगी, गणेश अक्कलकोट आणि कार्याध्यक्ष सिद्धार्थ खुने उपस्थित होते.
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे भव्य मोफत आरोग्य व नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सिक्युअर हॉस्पिटल, सोलापूर, लायन्स क्लब, सोलापूर आणि बाळीवेस शक्तीपूजा व समाजसेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. परिसरातील नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात नागरिकांची रक्तदाब, रक्तशर्करा, बोन डेन्सिटी, ईसीजी आणि सीबीसी यांसह विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच सीटी स्कॅन, एक्स-रे आणि एमआरआय या तपासण्यांसाठी 25 टक्के सवलतीच्या कूपनचे मोफत वाटप करण्यात आले. लायन्स क्लबच्यावतीने मोफत मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे.
या शिबिरासाठी गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी तज्ज्ञ डॉ. प्रदीप गजाकोश, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण स्वामी आणि न्यूरोलॉजिस्ट डॉ. वृजकुमार दुर्गे यांनी वैद्यकीय सेवा दिली. धार्मिक उत्सवाबरोबरच पर्यावरण संवर्धनाचाही संदेश देत मंडळाच्यावतीने 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. धार्मिक कार्यक्रमांसोबतच आरोग्यसेवा आणि पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून समाजहित साधण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी वीरेश कुदळे, रोहित सवळी, सिद्धार्थ कुडल, आकाश कुंभार, सचिन तुकमाळी, शिवराज धप्पाधुळे, इरेश डबरे यांनी परिश्रम घेतले.