सोलापूर : सोलापूर रेल्वे स्थानकावर गर्दीचा फायदा घेत एका महिलेची १५ हजार रुपये किमतीची पर्स पळवणाऱ्या चोरट्याला लोहमार्ग (रेल्वे) पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे थेट विजापूर (कर्नाटक) येथून शिताफीने अटक केली आहे.
चंदू हुलगप्पा रेड्डी (वय ३६, रा. रायचूर, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (२४ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. अक्कलकोट येथील समिना दस्तगीर चौधरी (वय ३५) या उद्यान एक्स्प्रेसने सोलापुरात आल्या होत्या. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील लिफ्टजवळ त्या बसल्या असताना, नजरचुकीचा फायदा घेत आरोपीने त्यांची पर्स लांबवली. यात १० हजार रुपयांचा मोबाईल आणि ५ हजारांची रोकड होती.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपी पर्स चोरून सोलापूर-विजापूर डेमू पॅसेंजरने पळाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ विजापूर येथील रेल्वे पोलिसांना फोटो पाठवून अलर्ट केले. त्यानंतर पीएसआय शब्बीर तांबोळी व त्यांच्या पथकाने थेट विजापूर गाठून आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला २६ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डी. एच. लोकरे करत आहेत.