No Result
View All Result
सोलापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटकदरम्यान रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई-बंगळुरू मार्गावर अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस १ नोव्हेंबर २०२६ पासून रुळावर येणार आहे. देशातील दुसरी, तर महाराष्ट्रातील पहिली स्लीपर वंदे भारत म्हणून या रेल्वेकडे पाहिले जात आहे.
विशेष म्हणजे या गाडीला सोलापूर स्थानकावरही थांबा देण्यात आल्याने सोलापूरकरांच्या रेल्वे प्रवासात आरामदायी आणि आधुनिक सुविधांची भर पडणार आहे.मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, या बहुप्रतीक्षित रेल्वेच्या उद्घाटन फेरीला रविवार, १ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.१५ वाजता एसएमव्ही बंगळुरू स्थानकातून हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी, प्रल्हाद जोशी, व्ही. सोमाण्णा, शोभा करंदलाजे आणि कृष्णा बायरे गौडा यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
तीन राज्यांना जोडणार आधुनिक रेल्वेसेवा : कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यांना जोडणारी ही रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे. मुंबईहून बंगळुरूकडे जाणाऱ्या प्रवाशांना रात्रीच्या प्रवासात आरामदायी झोपेची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर सोलापूर, कलबुरगी, रायचूर आणि अनंतपूर परिसरातील प्रवाशांनाही या सेवेचा लाभ मिळणार आहे.मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २ नोव्हेंबरपासून नियमित सेवा सुरू होणार आहे. गाडी क्रमांक २७६५१ मुंबईहून रात्री ८.१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता बंगळुरू येथे पोहोचणार आहे. ही गाडी मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. परतीची गाडी क्रमांक २७६५२ बंगळुरूहून सायंकाळी ७.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मुंबईत दाखल होणार आहे. ही सेवा सोमवार वगळता आठवड्यातून सहा दिवस उपलब्ध राहणार आहे.सोलापूरकरांना थेट मुंबई-बंगळुरू प्रवासाची सुविधा या रेल्वेला कल्याण, पुणे, सोलापूर, कलबुरगी, यादगीर, रायचूर, गुंटकल आणि अनंतपूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे असणार आहेत. सोलापूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांना जोडणारे महत्त्वाचे रेल्वे केंद्र असल्याने या गाडीचा फायदा व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी, नोकरदार आणि नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना होण्याची अपेक्षा आहे.
१ नोव्हेंबरपासून तिकीट आरक्षण : या रेल्वेचे तिकीट आरक्षण १ नोव्हेंबरपासून आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर, संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच रेलवन ॲपवर उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी तिकीट आरक्षण करता येणार आहे.
मुंबई-बंगळुरू अंतर अवघ्या १६ तासांत! : नियमित वेळापत्रकानुसार मुंबईहून बंगळुरूचा प्रवास १५ तास ५० मिनिटांत, तर बंगळुरूहून मुंबईचा प्रवास १६ तास १० मिनिटांत पूर्ण होणार आहे. वेग, सुरक्षितता आणि आरामदायी प्रवासाचा संगम असलेली ही रेल्वे महाराष्ट्राच्या रेल्वेसेवेत महत्त्वाची भर ठरणार आहे. विशेषतः सोलापूर स्थानकाला थांबा मिळाल्याने शहराच्या रेल्वे संपर्काला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
No Result
View All Result