‘अंधा युग’ नाटकाच्या प्रभावी सादरीकरणाला पारितोषिक; मध्य रेल्वेच्या मुख्य सतर्कता अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव
सोलापूर : मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील सतर्कता विभागाच्या वतीने ‘सतर्कता जनजागृती सप्ताह २०२६’ अंतर्गत आयोजित स्किट (लघुनाट्य) स्पर्धेत सोलापूर रेल्वे मंडळाच्या सांस्कृतिक अकादमीने उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. अकादमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या ‘अंधा युग’ या नाटकाला तृतीय पुरस्कार मिळाल्याने सोलापूर रेल्वे मंडळाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सतर्कता जनजागृती सप्ताहानिमित्त मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील सतर्कता विभागाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सोलापूर मंडळाच्या सांस्कृतिक अकादमीच्या पथकाने आपल्या प्रभावी अभिनयातून उपस्थितांची मने जिंकली. कलाकारांचे उत्कृष्ट सादरीकरण, कलात्मकता आणि सांघिक समन्वयाच्या जोरावर सोलापूर मंडळाने तृतीय क्रमांकावर आपले नाव कोरले.या यशाबद्दल मध्य रेल्वेचे मुख्य सतर्कता अधिकारी तथा वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या हस्ते सोलापूर मंडळाच्या सांस्कृतिक अकादमीच्या पथकाला पुरस्कार व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. या यशामुळे सोलापूर रेल्वे मंडळाच्या सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीला नवी ओळख मिळाली आहे.‘अंधा युग’ या नाटकात राजीव तलिवकर, अशोक कंपल्ली, प्रसाद सज्जन, भविता गायकवाड, स्वप्निल प्रकाश, गिरीश खरात आणि मोनिका सैनी या कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली.
सर्व कलाकारांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे नाटकाचे सादरीकरण प्रभावी ठरले.या नाटकाच्या यशस्वी सादरीकरणासाठी सोलापूरचे मंडळ रेल्वे व्यवस्थापक डॉ. सुजीत मिश्रा, अपर मंडळ रेल्वे व्यवस्थापक अंशुमाली कुमार, वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी विपिन कुमार सिंह आणि सहायक कार्मिक अधिकारी रमेश नायर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.सोलापूर रेल्वे मंडळाच्या सांस्कृतिक अकादमीने मिळविलेल्या या यशाबद्दल रेल्वे अधिकारी, कर्मचारी आणि सांस्कृतिक क्षेत्रातून कलाकारांचे अभिनंदन होत आहे.