No Result
View All Result
सोलापूर :दिवाळीच्या सुट्यांमुळे रेल्वे प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, नियमित रेल्वेगाड्यांमधील गर्दीने प्रवाशांचे हाल होत आहेत. विशेषतः सोलापूरहून पुणे, मुंबई आणि हैदराबादकडे जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रवासासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूरकरांच्या सोयीसाठी पुणे, मुंबई आणि हैदराबाद या प्रमुख शहरांसाठी स्वतंत्र विशेष रेल्वेगाड्या सुरू कराव्यात, अशी आग्रही मागणी प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
दिवाळीच्या सुट्यांमध्ये नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी तसेच विविध कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय वाढते. सुट्या संपल्यानंतर कामाच्या ठिकाणी परतण्यासाठी प्रवाशांची रेल्वेस्थानकांवर गर्दी उसळत आहे. मात्र, नियमित रेल्वेगाड्यांमध्ये आरक्षण मिळणे कठीण होत असल्याने प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
सोलापूर हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांना जोडणारे महत्त्वाचे रेल्वे केंद्र आहे. पुणे, मुंबई आणि हैदराबाद या शहरांशी सोलापूरचे शैक्षणिक, व्यावसायिक आणि रोजगाराच्या दृष्टीने जवळचे संबंध आहेत. त्यामुळे या मार्गांवर प्रवाशांची सातत्याने मोठी वर्दळ असते. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या आणखी वाढत असल्याने अतिरिक्त रेल्वेगाड्यांची आवश्यकता निर्माण झाली आहे.
प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आलेल्या मागणीनुसार, पुणे-मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वेगाड्या सुरू करण्याबरोबरच हैदराबाद इंटरसिटी रेल्वेचा विस्तार सोलापूरपर्यंत करण्यात यावा. याशिवाय सोलापूर-मुंबई मार्गावर उपलब्ध असलेल्या रेल्वेगाड्यांव्यतिरिक्त आणखी एक स्वतंत्र गाडी सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो. दरम्यान, या मागण्यांसंदर्भात रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेगाड्यांचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
No Result
View All Result