सहकार परिवार पॅनलचे १५ पैकी १५ जागांवर निर्विवाद वर्चस्व!
सोलापूर | सोलापूर शहरातील समर्थ सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व १५ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या सहकार परिवार पॅनलने आता बँकेच्या नेतृत्वाची धुराही निश्चित केली आहे. बँकेच्या अध्यक्षपदी किरण तुकाराम करकमकर, तर उपाध्यक्षपदी प्रशांत नरसिंह बागेवाडीकर यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडलेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्या सभेत या निवडीची घोषणा करण्यात आली.
समर्थ सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार परिवार पॅनलने विरोधकांना एकही जागा जिंकू न देता सर्व १५ जागांवर विजय मिळवला होता. या एकतर्फी विजयामुळे बँकेच्या सत्तेवर सहकार परिवार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व निर्माण झाले आहे. निवडणुकीतील या घवघवीत यशानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार, याकडे सहकार क्षेत्रातील जाणकारांसह बँकेच्या सभासदांचे लक्ष लागले होते. अखेर सोमवारी झालेल्या पहिल्याच सभेत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर झाल्याने नेतृत्वाचे चित्र स्पष्ट झाले.
नवनिर्वाचित अध्यक्ष किरण करकमकर आणि उपाध्यक्ष प्रशांत बागेवाडीकर यांच्याकडे बँकेच्या आगामी कामकाजाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आली आहे. सहकार क्षेत्रातील वाढती स्पर्धा, सभासदांचा विश्वास कायम राखणे, ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण, कर्जवाटपातील शिस्त आणि बँकेच्या आर्थिक प्रगतीला चालना देणे ही नव्या नेतृत्वासमोरील महत्त्वाची आव्हाने असणार आहेत. त्यामुळे नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या कारभाराला कोणती दिशा मिळते, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष राहणार आहे.
या निवड प्रक्रियेदरम्यान संचालक ओमप्रकाश सूर्यवंशी सिंग, दिव्यांशू राजेंद्र सिंग, स्वरूप दिलीप चौधरी, राहुल ओमप्रकाश सिंग, अमित बाळकृष्ण कामतकर, मुरलीधर श्रीकृष्ण खाडिलकर, दिलीप शिवमूर्ती दुलंगे, युवराज लक्ष्मण माने, मालती अमरबहादूर सिंग, सुजाता प्रकाश इनामदार, प्रकाश भिकाजी वंडगर, महानंद बापू कांबळे आणि रविंद्र बबन गारूडकर उपस्थित होते.
यावेळी आबासाहेब गावडे, बँकेचे व्यवस्थापक सुहास अदमाने तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडीची प्रक्रिया पार पडली.