No Result
View All Result
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचा कौतुकास्पद उपक्रम; बोनससह मिठाई, उटण्याचे वाटप
अक्कलकोट | श्री स्वामी समर्थांच्या सेवेत आयुष्य समर्पित करणाऱ्या सेवेकरी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा अधिक गोड झाली आहे. अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने दिवाळी सणानिमित्त कर्मचारी व सेवेकऱ्यांना एका महिन्याच्या वेतनाइतका बोनस देऊन अनोखी भेट देण्यात आली. ‘दिवाळी स्वामी प्रसाद’ या स्वरूपात देण्यात आलेल्या या बोनसबरोबरच मिठाई आणि उटण्याच्या पाकिटांचेही वाटप करण्यात आले. देवस्थानच्या या उपक्रमामुळे स्वामी सेवेकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी तसेच मंदिरातील विविध धार्मिक आणि दैनंदिन कामकाजासाठी कर्मचारी व सेवेकरी सातत्याने कार्यरत असतात. या सेवेकऱ्यांच्या योगदानाची दखल घेत देवस्थान समितीने दिवाळीनिमित्त त्यांना आर्थिक स्वरूपात भेट देण्याचा निर्णय घेतला.
मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते कर्मचारी व सेवेकऱ्यांना एका महिन्याच्या वेतनाइतक्या बोनसचे वाटप करण्यात आले. याशिवाय विबोधी फाउंडेशनच्या वतीने उटण्याची पाकिटे, तर मुंबई येथील स्वामीभक्त ॲड. मधुकर वैद्य व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यामुळे सेवेकऱ्यांना आर्थिक लाभाबरोबरच सणाचा गोडवाही अनुभवता आला.
यावेळी ॲड. मधुकर वैद्य यांनी स्वामी सेवेकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. श्री स्वामी समर्थांचे आपण निस्सीम भक्त असून स्वामींच्या सेवेत आपले जीवन व्यतीत करणाऱ्या सेवेकऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, हीच या उपक्रमामागील भावना असल्याचे त्यांनी सांगितले. देवस्थानच्या वतीने बोनस आणि आमच्या वतीने मिठाई वाटप करून सेवेकऱ्यांची दिवाळी गोड करता आल्याचे समाधान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या उपक्रमाचा सर्व कर्मचारी व सेवेकऱ्यांनी लाभ घेतला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे सेवेकऱ्यांच्या कष्टांचा सन्मान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. धार्मिक सेवेसोबतच कर्मचाऱ्यांच्या कल्याणालाही महत्त्व देणारा हा उपक्रम ठरला आहे.
यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, प्रा. शिवशरण अचलेर, प्रसाद सोनार, जयप्रकाश तोळणूरे, गिरीश पवार, अविनाश क्षीरसागर, संजय पवार, महेश मस्कले, श्रीशैल गवंडी यांच्यासह कर्मचारी व सेवेकरी उपस्थित होते.
No Result
View All Result