सोलापूर : ग्रामीण भागातील महिलांच्या कष्टाला बाजारपेठ, कौशल्याला व्यासपीठ आणि स्वावलंबनाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने सोलापूर जिल्हा परिषद परिसरात ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चा उत्साहात शुभारंभ झाला. महिला बचत गटांनी स्वतः तयार केलेल्या विविध वस्तू आणि उत्पादनांच्या विक्रीसाठी आयोजित या महोत्सवामुळे ग्रामीण महिला उद्योजिकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत जिल्हा परिषद सोलापूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ॲड. अमृता वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी नाना कांबळे, सचिन जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव, संतोष डोंबे, मीनाक्षी मडीवळी, दयानंद सरवळे, लेखाधिकारी शुभांगी देशपांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपाध्यक्षांकडून खरेदी; महिला उद्योजिकांना प्रोत्साहन उद्घाटनानंतर उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी महिला बचत गटांच्या विविध स्टॉलला भेट देऊन महिलांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, त्यांनी स्वामिनी महिला बचत गटाच्या स्टॉलवरून स्वतः विविध उत्पादनांची खरेदी केली. महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची गुणवत्ता आणि त्यांच्या मेहनतीचे कौतुक करत ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना अधिकाधिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी महोत्सवातील सर्व स्टॉलची पाहणी करून महिला उद्योजिकांशी संवाद साधला. उत्पादनांची निर्मिती, गुणवत्ता, विक्री आणि बाजारपेठेतील संधी यांची माहिती घेत त्यांनी उत्पादनांचे आकर्षक पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि दर्जेदार सादरीकरण यावर विशेष भर देण्याच्या सूचना केल्या. उत्पादन चांगले असण्याबरोबरच त्याचे पॅकिंग आणि सादरीकरणही ग्राहकांना आकर्षित करणारे असावे, असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी महोत्सवात उत्पादनांचे पॅकेजिंग अधिक व्यावसायिक स्वरूपात करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही त्यांनी केले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ॲड. अमृता वाघे यांनीही बचत गटांच्या महिलांचे कौतुक केले. महिलांनी उत्पादन निर्मितीबरोबरच विक्री, विपणन आणि गुणवत्ता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
रुक्मिणी दिवाळी महोत्सव हा केवळ वस्तूंच्या विक्रीचा उपक्रम नसून ग्रामीण महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे. महिलांच्या हाताला काम, उत्पादनांना बाजारपेठ आणि कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात भर घालण्याची संधी या माध्यमातून निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी महोत्सवाला आवर्जून भेट देऊन महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करावी आणि त्यांच्या स्वावलंबनाच्या प्रवासाला हातभार लावावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले.