सोलापूर : साखर कारखानदारीसमोर सध्या आर्थिक अडचण, साखरेच्या दरातील चढ-उतार, इथेनॉलच्या उठावातील अडथळे आणि दुष्काळी परिस्थिती अशी अनेक संकटे आहेत. सहकारी साखर कारखानदारी टिकली तरच शेतकर्यांना उसाला योग्य दर मिळू शकतो. त्यामुळे सभासद शेतकरी आणि कर्मचार्यांनी एकजुटीने सहकार चळवळीतील सिध्देश्वर सहकारी कारखाना यंदा चांगल्या पध्दतीने चालवून व जास्तीत जास्त ऊस गाळप करून यशस्वी करावा, असे आवाहन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी केले.
रविवारी, सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 2026-27 मधील 54 व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज ऊर्फ पुष्पराज काडादी, उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते यांच्या हस्ते विधिवत पूजनानंतर उसाची मोळी गव्हाणीत टाकून करण्यात आला. त्यावेळी काडादी बोलत होते. प्रारंभी ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर आणि कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी ऊस भरून आलेल्या वाहनांचे तसेच वजन काट्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यकारी संचालक एम. बी. अथणी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.काडादी म्हणाले, गेल्या वर्षभरापासून कारखान्याला सातत्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
यंदा कारखान्याकडे साखरेचा साठा उपलब्ध नसताना साखरेच्या दरात प्रतिक्विंटल 200 रुपयांनी वाढ झाली. मात्र, आता साखरेचे उत्पादन वाढल्यास पुन्हा दर घसरण्याची शक्यता आहे. इथेनॉल उत्पादनातून साखर कारखान्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत इथेनॉलला अपेक्षित उठाव नसल्याने कारखान्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्याचा परिणाम शेतकरी आणि कामगारांवरही झाला.गेल्या 50 वर्षांच्या कारखानदारीच्या इतिहासात कामगारांचे वेतन थांबण्यासारखी परिस्थिती कधी निर्माण झाली नव्हती. मात्र, यंदा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. कारखान्याची आर्थिक कोंडी दूर करण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून संचालक मंडळ आणि अधिकारी प्रयत्न करीत आहेत. राज्य शासनाच्या हमीने राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) आठ टक्के व्याजदराने 199 कोटी रुपयांचे कर्ज मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट पालकमंत्र्यांच्या माध्यमातून घेतली असून पुढील आठवड्यात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. हे कर्ज मिळाल्यास कारखान्यावरील अधिक व्याजदराच्या कर्जाचा बोजा कमी करून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल, असे काडादी यांनी सांगितले.मागील दोन हंगामात गाळप कमी झाल्याने कारखान्यास झालेला शंभर कोटी रुपयांचा तोटा भरून काढण्यासाठी कारखान्याच्या गाळप क्षमतेचा अधिकाधिक वापर करून यंदा जास्तीत जास्त गाळप करण्याची गरज आहे. यंदा दुष्काळामुळे अनेक ठिकाणी ऊस वाळत आहे. अशा उसाला प्राधान्याने तोड देण्यासाठी नियमावली केली जाईल. मात्र, पाणी उपलब्ध असलेल्या शेतकर्यांनी कोवळा ऊस गाळपासाठी घाईने पाठवू नये. त्यामुळे साखर उतार्यावर परिणाम होऊन कारखान्याच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो, असे काडादी म्हणाले.यंदाच्या हंगामात उसाला चांगला दर मिळावा, यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे मागणी केली जात आहे.
शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारही यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, सहकारी साखर कारखानदारी टिकली तरच शेतकर्यांच्या उसाला योग्य भाव मिळू शकेल. त्यामुळे सभासद, बिगर सभासद शेतकरी आणि कर्मचार्यांनी एकजुटीने कारखान्याच्या यशस्वी वाटचालीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन काडादी यांनी केले. कर्मचार्यांचा पगार व बोनस येत्या दोन दिवसांत खात्यात जमा होईल. शेतकर्यांचीही बिले लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचेही ते म्हणाले.यावेळी उपाध्यक्ष चाकोते म्हणाले, सभासद शेतकर्यांनी अन्य कारखान्याला ऊस न पाठविता सहकार चळवळीतील आपल्याच कारखान्याला ऊस गळितास पाठवावा.
या कार्यक्रमास कारखान्याचे आजी-माजी संचालक, सिध्देश्वर देवस्थानचे विश्वस्त, शेतकरी सभासद, अधिकारी, कर्मचारी, कामगार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्राम बबलेश्वर यांनी केले. तर संचालक महादेव जम्मा यांनी आभार मानले.