सोलापूर, : एकीकडे ढोल-ताशांचा गजर, भगव्या ध्वजांची फडकणारी गर्दी आणि ‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव, देश बचाव’च्या घोषणांनी बुधवारी सोलापूर शहर दणाणून गेले; तर दुसरीकडे याच विराट राजकीय शक्तिप्रदर्शनामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार, माजी आमदार, महापालिका आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. मात्र, या मोर्चामुळे शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. विशेष म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज चौकात रुग्णवाहिकेलाही वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. त्यामुळे राजकीय शक्तिप्रदर्शनाच्या उत्साहात सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

देशातील लोकशाही व्यवस्था, संविधानिक संस्था आणि निवडणूक प्रक्रियेबाबत विरोधकांकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. विरोधकांच्या कथित अपप्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून भाजपने सोलापुरात आपली संघटनात्मक ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला.
मोर्चासाठी दुपारी चार वाजताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती. शहराच्या विविध भागांतून मोटारसायकल रॅलीद्वारे कार्यकर्ते चौकात दाखल होत होते. ढोल-ताशे, बँजो पथके, भगवे ध्वज आणि घोषणाबाजीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नियोजित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशिराने मोर्चाला सुरुवात झाल्याने वाहतुकीवरील ताण अधिकच वाढला. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सरस्वती चौक, धर्मवीर संभाजी महाराज चौक, नवी पेठ, बाळीवेस तसेच जुनी पोलीस लाईन ते कल्पना टॉकीज या प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना काही अंतर पार करण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत होती. अनेक ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू होती, तर काही मार्गांवर वाहनांची चाके अक्षरशः थांबली होती.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रमुख मार्गांवर बॅरिकेटिंग करून वाहतुकीत बदल केले होते. बाळीवेस ते मधला मारुती या प्रमुख व्यापारी मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. मोर्चात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी शहराबाहेरील चार ठिकाणी स्वतंत्र वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, अनेक कार्यकर्त्यांची वाहने थेट छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पोहोचल्याने वाहतूककोंडीत आणखी भर पडली. दिवाळीच्या खरेदीसाठी शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आधीच नागरिकांची वर्दळ वाढलेली असताना मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूककोंडीचा मोठा फटका खरेदीदारांना बसला. बाजारपेठेत पोहोचण्यासाठी तसेच खरेदी करून घरी परतण्यासाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. व्यापारी पेठेतील वाहतुकीवरील निर्बंधांमुळे ग्राहकांचीही गैरसोय झाली.
या विराट मोर्चात आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, देवेंद्र कोठे, राजेंद्र राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक, राजन पाटील, दिलीप माने, नरसिंग मेंगजी, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, दीपक साळुंखे-पाटील, रोहिणी तडवळकर, शहाजी पवार, कांचना यन्नम, रंजिता चाकोते, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भाजप संविधानाचा सन्मान करणारा पक्ष : आ. सचिन कल्याणशेट्टी
भारतीय जनता पार्टी ही संविधानाचा सन्मान करणारी आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणारी संघटना आहे. देशाच्या विकासाच्या वाटचालीत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींना जनतेने ओळखले पाहिजे. या मोर्चाच्या माध्यमातून भाजपची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
………………………….










