सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल) सात महिन्यांपासून एमआरआय मशीन बंद आहे. एमआरआयची चाचणी महागडी आहे. सिव्हिलमध्ये कमी पैशात एमआरआय चाचणी होत असल्याने सोय होत होती. पण, ती मशिनच बंद असल्याने रुग्णांना आता तपासणीसाठी खासगी केंद्रावर जावे लागत आहे. ११ वर्षांच्या वापरानंतर जुन्या मशीनची वैधता संपली आहे. नव्या एमआरआय मशीनसाठी ऑर्डर मिळाली आहे. पण, जुन्या मशिनच्या जागीच नवी मशीन बसवण्यात येणार आहे. परंतु, जुनी मशीन काढण्यासाठी शासनाने अद्याप मान्यता दिलेली नाही. आणखी महिनाभर तरी नवीन मशिन सुरु होण्याची शक्यता नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ११ वर्षांपूर्वीच्या एमआरआय मशीनचा वैद्यकीय कालावधी संपल्यामुळे सात महिन्यांपूर्वी हे मशिन बंद करण्यात आले.
राज्य सरकारने आता सिव्हिलमध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर सिव्हीलमधील एमआरआयची सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एका प्रायव्हेट कंपनीची नियुक्तीही करण्यात आली आहे. त्या मशीनचे ऑपरेटिंग खासगी कंपनीकडूनच होणार आहे. शिवाय त्यांच्यामार्फतच सवलतीच्या दरात चाचण्या केल्या जाणार असल्याचेही सांगण्यात आले.










