सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेने व्यावसायिक वापरासाठी दिलेले गाळे, मूळ भाडेधारकांनी स्वतः न वापरता इतर व्यक्तींना पोटभाड्याने दिल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी प्रशासनाला कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्र्यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, “ज्या लोकांना महापालिकेने गाळे दिले होते, त्यांनी ते स्वतः न वापरता पोटभाडेकरू ठेवले आहेत. अशा गाळ्यांचा ताबा त्वरित काढून घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.
ज्या गाळेधारकांनी पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करून गाळे तिसऱ्याच व्यक्तीला भाड्याने दिले आहेत, अशांची यादी तयार करणे. जे भाडेकरू शासनाने ठरवून दिलेल्या रेडिरेकनर दराप्रमाणे भाडे भरत असतील, त्यांना नियमानुसार सवलत मिळेल. मात्र, जे भाडे भरण्यास टाळाटाळ करत आहेत किंवा नियमांचे उल्लंघन करत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. यावेळी बैठकीला महानगरपालिका आयुक्त आणि इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या निर्णयामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून, बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेला गाळ्यांचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.