सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. १९ एप्रिल रोजी निघणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या अनुषंगाने आज मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यात महापौर विनायक कोंड्याल यांच्या समवेत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त गौउर हसन, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, नगर अभियंता सारिका अकुलवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेश परदेशी ,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती व बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यामध्ये राजाभाऊ सरवदे, आनंद चंदनशिवे, बाळासाहेब वाघमारे,,के.डी.कांबळे,मिलिंद प्रेक्षाळे, सुबोध वाघमोडे,अजित बनसोडे,प्रवीण निकाळजे, रॉकी बंगाळे, सुशील सरवदे,दशरथ कसबे, पिंटू डावरे, विकी शेंडगे, शिवम सोनकांबळे,विनोद वाघमारे, बबन शिंदे तसेच ,,लौकिक इंगळे,विनीत गायकवाड,सुग्रीव जेटीथोर,अविनाश आठवले,योगेश कांबळे,शुभम धावने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मिरवणूक मार्गावरील विविध बाबींची सखोल पाहणी करण्यात आली. मिरवणुकीदरम्यान कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यावरील झाडांच्या फांद्या छाटणे, खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे, विद्युत खांबांवरील दिव्यांची दुरुस्ती करणे तसेच इतर आवश्यक कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना महापौर कोंड्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याचे निर्देशही देण्यात आले.
यावेळी पोलीस आयुक्त एम. राजकुमार म्हणाले, “मिरवणूक मार्गावर कोणत्याही प्रकारचा वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस विभागाकडून सविस्तर नियोजन करण्यात आले असून आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक वळविणे, बंदोबस्त वाढविणे आणि नियंत्रणासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येणार आहे.

”महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाच्या वतीने सर्वोत्तम आणि सर्वंकष तयारी करण्यात आली असून नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मिरवणूक मार्ग स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित राहावा यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत. तसेच नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करून शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.”











