सोलापूर ; सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कुशल जैन यांनी पदभार स्वीकारताच प्रशासनात शिस्त आणण्यास सुरुवात केली आहे. गुरुवार, दि. २३ एप्रिल रोजी सकाळी त्यांनी आपल्या निजी कक्षातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची थेट नोंद घेतली.
त्यानंतर संबंधित विभागांकडून हजेरी मस्टर मागवून उशिरा हजर झालेल्या ४३ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांना दिले.यापुढे सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे, असे स्पष्ट निर्देश सीईओ जैन यांनी दिले आहेत. तसेच कार्यालयीन वेळ उलटल्यानंतर सलग तीन दिवस उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची एक दिवसाची गैरहजेरी नोंदविण्यात येईल, अशा सूचना संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. सीईओ जैन यांच्या या कठोर भूमिकेमुळे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, जिल्हा परिषदेत शिस्तीचे वातावरण निर्माण होण्याची चर्चा सुरू आहे.
- विभागनिहाय उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या
- शिक्षण योजना – ०१
- प्राथमिक शिक्षण – ०८
- स्वच्छ भारत मिशन – ०७
- लघुपाटबंधारे – ०२
- कृषी – ०३
- ग्रामीण पाणीपुरवठा – ०६
- बांधकाम (क्रमांक २) – ०१
- पशुसंवर्धन – ०२
- माध्यमिक शिक्षण – ०२
- समाज कल्याण – ०२
- बांधकाम (क्रमांक १) – ०३
- आरोग्य विभाग – ०१
- ग्रामपंचायत – ०४
- अर्थ विभाग – ०१
- एकूण – ४३ कर्मचारी










