उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईचा हंगाम; पुढील काही दिवसांचे रेल्वे आरक्षण फुल्ल
सोलापूर | : उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लग्नसराईच्या हंगामामुळे सोलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी होत आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्याने अनेक कुटुंबे गावी तसेच पर्यटनासाठी बाहेर पडत असून त्याचा मोठा ताण रेल्वे वाहतुकीवर दिसून येत आहे. स्थानकावरील फलाट प्रवाशांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरहून मुंबई, पुणे, नागपूर, बंगळुरू आणि दिल्लीकडे जाणाऱ्या प्रमुख गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. वाढत्या गर्दीमुळे पुढील काही दिवसांचे बहुतांश गाड्यांचे तिकीट आरक्षण पूर्णपणे भरले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. अनेक गाड्यांच्या वेटिंग लिस्टनेही मोठा आकडा गाठल्याने ऐनवेळी तिकीट मिळवणे प्रवाशांसाठी कठीण बनले आहे.यामुळे जनरल तिकीट खिडक्यांवरही प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. सामान आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी फलाटांवर पाहायला मिळत आहे.प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काही विशेष उन्हाळी गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र वाढत्या गर्दीच्या तुलनेत त्या अपुऱ्या पडत असल्याचे स्पष्ट होत आहे.दरम्यान, वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि स्थानक प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत.












