सोलापूर :जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शुक्रवारी नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. या पहिल्याच सभेत प्रशासनाकडून सदस्यांना लेदर बॅगचे वाटप करण्यात आल्याने सभागृहात आणि जिल्हा परिषद वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगली. मागील चार वर्षांपासून जिल्हा परिषदेत प्रशासकराज होते. सार्वत्रिक निवडणुकांनंतर आता लोकशाही पद्धतीने नव्या लोकप्रतिनिधींची नियुक्ती झाल्याने मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कामकाजाला पुन्हा गती मिळाली आहे.

सभेदरम्यान सदस्यांनी या बॅगमध्ये आपापली कागदपत्रे व्यवस्थित ठेवून घेतली. मात्र सभा संपल्यानंतर सदस्य हातात बॅगा घेऊन बाहेर पडताना पाहून अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. प्रशासनाने दिलेल्या बॅगेत नेमकं काय आहे? असा उत्सुकतेचा प्रश्न अनेकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.जिल्हा परिषदेत नव्या कार्यकाळाची सुरुवात आणि पहिल्याच सभेत बॅग वाटप झाल्याने हा विषय दिवसभर चर्चेचा ठरला.












