हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अखेरचा श्वास; कुमठा नाका परिसरात शोककळा
सोलापूर ; सोलापूर शहरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक तसेच आंबेडकरी चळवळीतील सक्रिय नेते प्रवीण निकाळजे यांचे शनिवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच काँग्रेस कार्यकर्ते, समर्थक आणि कुमठा नाका परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत्यूसमयी प्रवीण निकाळजे यांचे वय सुमारे ५८ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. संजय नगर, कुमठा नाका येथील निवासस्थानी पहाटेच्या सुमारास त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्यांना अश्विनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून, तेथे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निकाळजे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या निधनामुळे अनेकांना अश्रू अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.


प्रवीण निकाळजे हे २०१७ मध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक २० मधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. आंबेडकरी समाजातील प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आंबेडकरी नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीऐवजी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. २०२६ च्या आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलीला काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. शनिवारी सायंकाळी मोदी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या निधनाने सोलापूर शहरासह कुमठा नाका परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.










