सोलापूर ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी गावात कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महांतेश सूर्यकांत ऐवळे यांचा त्यांचा लहान भाऊ संतोष सूर्यकांत ऐवळे याने डोक्यात दगड घालून खून केल्याचा आरोप आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून गंभीर जखमी झालेल्या महांतेश ऐवळे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.


कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल?
प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही भावांमध्ये काही कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर संतापाच्या भरात लहान भावाने मोठ्या भावावर दगडाने हल्ला केल्याची चर्चा गावात असून पोलिसांकडून घटनेमागील नेमके कारण शोधले जात आहे.












