सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेची शुचिता आणि पारदर्शकता अबाधित राहावी, यासाठी उमेदवार वसंतराव देशमुख यांनी पुढाकार घेत राज्य आणि जिल्हा निवडणूक प्रशासनाकडे विशेष उपाययोजनांची मागणी केली आहे. निवडणूक प्रक्रियेवरील मतदारांचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने देशमुख यांनी संभाव्य गैरप्रकारांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात देशमुख यांनी कथित ‘चेन व्होटिंग’ प्रकाराची शक्यता व्यक्त केली आहे. अशा प्रकारांमुळे गुप्त मतदानाच्या मूलभूत तत्त्वाला बाधा पोहोचू शकते आणि मतदारांच्या स्वतंत्र निर्णयक्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले आहे.

मतदान प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी मतदान केंद्रांवर वितरित व जमा झालेल्या मतपत्रिकांचा नियमित ताळमेळ ठेवणे, मतपत्रिका मतदान केंद्राबाहेर नेण्यास प्रतिबंध करणे, मतदान केंद्र परिसरात विशेष देखरेख यंत्रणा उभारणे, भरारी पथके आणि सूक्ष्म निरीक्षकांना सतर्कतेच्या सूचना देणे, तसेच संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई करावी, अशा ठोस सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात मतदान करता यावे, ही लोकशाहीची मूलभूत अपेक्षा आहे. मतदान प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती दक्षता घ्यावी,” अशी भूमिका देशमुख यांनी मांडली.

निवडणुकीपूर्वीच संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी केलेल्या या पुढाकारामुळे वसंतराव देशमुख यांच्या पारदर्शक आणि स्वच्छ निवडणूक प्रक्रियेच्या भूमिकेची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.











