सोलापूर : वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक), सोलापूर येथील अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) विठ्ठल ढेपे यांच्याकडे सोपविण्यात आल्याने जिल्ह्यातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक, डॉ गणपत मोरे पुणे विभाग यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून, शिक्षण क्षेत्रात कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अधिकाऱ्याच्या हाती ही जबाबदारी आल्याने प्रलंबित कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
विठ्ठल ढेपे यांनी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना शिक्षकांच्या विविध सेवा विषयक प्रश्नांवर संवेदनशीलतेने आणि तत्परतेने कार्य केले आहे. शालार्थ आयडी मंजुरी, वेतन निश्चिती, वरिष्ठ वेतनश्रेणी, निवृत्तीवेतन प्रस्ताव, सेवा पुस्तिका दुरुस्ती तसेच विविध प्रशासकीय अडचणींमध्ये त्यांनी अनेक शिक्षकांना वेळोवेळी मार्गदर्शन व मदत केली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात त्यांची प्रतिमा अभ्यासू, समन्वयक आणि शिक्षकहित जपणारे अधिकारी अशी निर्माण झाली आहे.अधीक्षक पद रिक्त झाल्यानंतर या कार्यालयातील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र ही जबाबदारी ढेपे यांच्याकडे सोपविण्यात आल्याने शिक्षकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषतः वेतन, भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्तीवेतनाशी संबंधित प्रकरणांचा निपटारा अधिक वेगाने होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून, डेपे यांच्या अनुभवाचा फायदा संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांना होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. शिक्षकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर सकारात्मक भूमिका घेणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख असल्याने या नियुक्तीकडे आशादायी दृष्टीने पाहिले जात आहे.जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी सामाजिक माध्यमांवर आणि विविध चर्चांमधून या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. शिक्षण विभागातील कामकाज अधिक गतिमान होऊन प्रलंबित प्रकरणांना चालना मिळेल, असा विश्वास शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.