जिल्हा परिषद मधील कंत्राटी आणि कायम कर्मचारी यांच्यामधील वाद चिघळला.
सोलापूर : पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या आरोग्य विभागाच्या निविदा प्रक्रियेदरम्यान कंत्राटी व कायम कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादाची चर्चा सध्या जिल्हा परिषद वर्तुळात रंगली आहे. कार्यालयीन फाईल तपासणीच्या मुद्द्यावरून झालेला हा वाद थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचल्याचे समजते.
माहितीनुसार, वारकऱ्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मेडिसिन ऑन व्हील्स’ या उपक्रमाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या निविदेची कागदपत्रे सहाय्यक लेखा अधिकारी संजय पाटील यांनी तपासावीत, अशा सूचना मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी प्रदीप नामदे यांना दिल्या होत्या. त्यानुसार नामदे हे संबंधित फाईल घेऊन पाटील यांच्याकडे गेले असता यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे सांगितले जात आहे.
या वादात कंत्राटी व कायम कर्मचारी असा भेदभाव झाल्याचा आरोप करण्यात येत असून, त्यामुळे निविदेची प्रक्रिया काही काळ रखडल्याची चर्चा आहे. पंढरपूर आषाढी वारीसारख्या महत्त्वाच्या धार्मिक सोहळ्याच्या तयारीसाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत असताना, अशा प्रकारच्या अंतर्गत वादामुळे शासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप नामदे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असून वरिष्ठांच्या सूचनेनुसार संबंधित फाईलचे समन्वयाचे काम करत होते. मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार त्यांनी कागदपत्रे तपासणीसाठी पाठविल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे अतिरिक्त जबाबदारी पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मनस्ताप सहन करावा लागत असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.
दरम्यान, या वादामुळे ‘मेडिसिन ऑन व्हील्स’ उपक्रमाच्या निविदा प्रक्रियेवर परिणाम झाला आहे का, तसेच पुढील कार्यवाही काय होणार, याकडे संबंधित विभागाचे लक्ष लागले आहे. वारीच्या तोंडावर अशा प्रकारच्या प्रशासकीय मतभेदांमुळे महत्त्वाच्या कामांचा वेग मंदावू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रकरणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, वरिष्ठ पातळीवर याबाबत चौकशी किंवा समन्वयातून तोडगा निघतो का, याकडेही कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
वारीच्या टेंडर चे पुढे काय होणार जे टेंडर करण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त होता त्या टेंडर चे काम कंत्राटी आणि कायम कर्मचाऱ्यांच्या वादामुळे प्रलंबित पडले आहे आता या कामाकडे कोण लक्ष देणार ते काम ठप्प झाले आहे. संजय पाटील यांनी कायम व कंत्राटी याचा विचार न करता फाईल मार्गी लावली असती तर हा वाद विवाद झालाच नसता आणि काम ही मार्गी लागले असते अशी चर्चा आरोग्य विभागात चालली आहे त्यामुळे आता या टेंडर चे काय होणार याची चर्चा चांगलीच रंगली आहे. अशा त्रासामुळे कंत्राटी कर्मचारी भविष्यात अतिरिक्त कामकाज करतील का? असे अनेक प्रश्न उद्भवणार आहेत.