सोलापूर ; शालेय शिक्षण विभागाने अखेर एक मोठा निर्णय घेत, गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पदावर आणि कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या तब्बल ६९ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदल्यांचे आदेश काढत शिक्षण विभागाने अनेक अधिकाऱ्यांची वर्षानुवर्षांची मक्तेदारी मोडीत काढली आहे. या धडक कारवाईमुळे शिक्षण वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. शिक्षण आयुक्त कार्यालय, माध्यमिक व उच्च शिक्षण संचालनालय, प्राथमिक शिक्षण संचालनालय, योजना शिक्षण संचालनालय, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि विविध जिल्ह्यांतील शिक्षणाधिकारी कार्यालयांमध्ये अनेक अधिकारी गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ एकाच जागेवर कार्यरत होते.
दीर्घकाळ एकाच ठिकाणी राहिल्यामुळे काही अधिकाऱ्यांची एकप्रकारे मक्तेदारी निर्माण झाली होती. हीच मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी प्रशासकीय कारणास्तव या सर्व बदल्या करण्यात आल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षण विभागातील विविध संवर्गातील एकूण ६९ अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यात अधिव्याख्याता २३, उपशिक्षणाधिकारी १५, वरिष्ठ अधिव्याख्याता १५, शिक्षणाधिकारी ११,अधीक्षक ५ यांचा समावेश असून या सर्वांना तातडीने कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बदली टाळल्यास कारवाई होणार शालेय शिक्षण विभागाने या बदल्यांचे आदेश अत्यंत कडक स्वरूपात काढले आहेत. बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदभारातून तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश संबंधित प्रमुखांना देण्यात आले आहेत. तसेच, नवे अधिकारी दिलेल्या मुदतीत आपल्या पदावर रुजू होतील, याची खातरजमा करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, बदली टाळण्यासाठी राजकीय दबाव आणणे किंवा इतर कोणतेही प्रयत्न करणे हे गैरवर्तणूक’समजले जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यावर कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा कडक इशाराही शालेय शिक्षण विभागाने दिला आहे.
आता ‘विनंती बदल्यां’कडे लक्ष या धडक प्रशासकीय बदल्यांनंतर आता शिक्षण विभागातील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष ‘विनंती बदल्यांकडे’ लागले आहे. प्रशासकीय बदल्यांचा मार्ग मोकळा झाल्यामुळे, आता विनंती बदल्यांसाठी कधी मुहूर्त सापडणार आणि त्यासाठी शासनाचे काय धोरण असणार, याबाबत शिक्षण क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे.