सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जात असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा उचलत उपरोधिक आंदोलन केले. सोन्या मारुती चौक येथे झालेल्या आंदोलनातून शहरातील खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मनसेच्या सोलापूर शहर व जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित आंदोलनात शहरातील विविध भागांतील खड्ड्यांची छायाचित्रे असलेले पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले. तसेच प्रतीकात्मक स्वरूपात ‘खड्ड्यांचा केक’ कापून महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपने “शहरातील ५६ खड्डे दाखवा, आम्ही बुजवू” असे आवाहन केले होते. त्याचाच संदर्भ घेत मनसेने “पालिका प्रशासनाने हेच ५६ खड्डे तातडीने बुजवून त्याचे लोकार्पण करावे,” असा उपरोधिक टोला लगावला.
यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून नागरिकांना गंभीर दुखापतींसह मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप केला. खड्ड्यांसाठी महापालिका प्रशासनाला जबाबदार धरत तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा मनसेच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनविसेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष माने, निलेश भंडारे, वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक प्रसाद कुमठेकर, शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी, सरचिटणीस विश्वास गजभार, शहर उपाध्यक्ष वैभव धोत्रे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष जयश्री हिरेमठ यांच्यासह महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.