सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबविलेल्या ‘ऑपरेशन समन्वय’ अंतर्गत चिंचोली एमआयडीसी (ता. मोहोळ) येथे मोठी धडक कारवाई करत बनावट देशी दारू निर्मितीचे संघटित रॅकेट उद्ध्वस्त केले. या कारवाईत तब्बल २ कोटी १ लाख ४५ हजार २८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. बनावट दारूच्या या उद्योगामुळे शासनाचा ७० लाख ४० हजार ५८७ रुपयांचा महसूल बुडाल्याचे तपासात समोर आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पत्रकार परिषदेत विभागीय उपायुक्त सागर धोमकर, अधीक्षक भाग्यश्री जाधव आणि उपअधीक्षक सौरभ अदाटे यांनी या कारवाईची माहिती दिली. २९ जुलै रोजी करण्यात आलेल्या छाप्यात चिंचोली एमआयडीसीतील तीन गोदामांवर एकाच वेळी कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान ४१ हजार ३०० सीलबंद दारूच्या बाटल्या, ६९ बॅरल्समधील १३ हजार ८०० लिटर स्पिरिट, १ हजार २०० लिटर तयार ब्लेंड, स्वयंचलित बॉटलिंग मशिन्स, प्रिंटर, वाहने तसेच बनावट दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासात ही बनावट दारू सोलापूरसह बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पुरवली जात असल्याचे उघड झाले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या काही महिन्यांपासून परराज्यातून येणाऱ्या अवैध मद्य व बनावट दारूविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. एप्रिल ते ३० जुलै या कालावधीतही अनेक कारवाया करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चिंचोली एमआयडीसीतील ही कारवाई त्या मोहिमेतील सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त सागर धोमकर, अधीक्षक भाग्यश्री जाधव आणि उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या ही यशस्वी कारवाई केली.