सोलापूर: छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) बहुचर्चित बनावट दिव्यांग प्रमाणपत्र गैरव्यवहार प्रकरणात शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक सागर राजपूत आणि कनिष्ठ लिपिक वसीम खान या दोन कर्मचाऱ्यांना मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईमुळे शासकीय रुग्णालय वर्तुळात आणि प्रशासनात तीव्र खळबळ उडाली आहे.बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तयार करून त्यांचा विविध कारणांसाठी गैरवापर केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून या प्रकरणाचा तपास शहर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी मुख्य आरोपीशी थेट संबंध असलेल्या राजपूत आणि खान या दोन कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईमुळे या गैरव्यवहारातील एकूण अटक आरोपींची संख्या आता सातवर पोहोचली आहे.प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलीस अधिकारी आणि तपासी पथक रवाना झाले आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले संगणक, हार्ड डिस्क, प्रिंटर तसेच त्यांचे कॉल डिटेल्स पोलिसांकडून खंगाळले जात आहेत.
हे बनावट प्रमाणपत्र वितरणाचे जाळे किती मोठे आहे, आतापर्यंत किती लोकांना अशी बनावट प्रमाणपत्रे वाटण्यात आली आणि यामागे एखादी मोठी टोळी कार्यरत आहे का, या दिशेने पोलीस सखोल तपास करत आहेत. तपासाचा भाग म्हणून रुग्णालयातील जुने दाखले, कागदपत्रे आणि अधिकृत नोंदींचीही पडताळणी सुरू आहे.अटक करण्यात आलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांना पोलीस कोठडीत ४८ तासांपेक्षा जास्त वेळ झाल्यामुळे शासकीय नियमानुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. सिव्हिल प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.