सोलापूर : बेडा जंगम, बुडगा जंगम आणि माला जंगम जातीच्या नावाने कथितरीत्या खोट्या अथवा बनावट कागदपत्रांच्या आधारे देण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मागासवर्गीय समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे माजी महापौर सुशीला आबुटे, नगरसेवक नरसिंह आसादे, अॅड. केशव इंगळे, प्रमिला तुपलवंडे, गिरीधर थोरात, हणमंतु सायबोळु, बाबुराव म्हेत्रे, दिनेश म्हेत्रे, अॅड. मयुर खरात, सुभाष वाघमारे, संजय गायकवाड आदींच्या शिष्टमंडळाने तहसीलदार दिनेश पारगे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच मुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्र्यांनाही ई-मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात, गेल्या १५ वर्षांत बेडा जंगम, बुडगा जंगम व माला जंगम जातीच्या नावाने जारी करण्यात आलेल्या सर्व जात प्रमाणपत्रांची जिल्हानिहाय, तालुकानिहाय आणि वर्षनिहाय फेरतपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रमाणपत्रांसाठी सादर करण्यात आलेली कागदपत्रे, वंशावळ, महसुली नोंदी आणि इतर पुराव्यांची सक्षम यंत्रणेमार्फत पुनर्पडताळणी करावी, असेही नमूद करण्यात आले आहे खोट्या कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र मिळाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करून, त्या आधारे मिळालेल्या शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती, शासकीय नोकरी, आरक्षण आणि इतर शासकीय लाभांचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच बनावट कागदपत्रे तयार करणारे, वापरणारे किंवा चुकीची प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी व विभागीय कारवाई करण्याचीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
भविष्यात अशा प्रकारच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी जात प्रमाणपत्र देण्यापूर्वी कागदपत्रांची काटेकोर पडताळणी करावी, संशयास्पद प्रकरणांसाठी स्वतंत्र चौकशी यंत्रणा स्थापन करावी आणि पात्र लाभार्थ्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळेल याची शासनाने खात्री करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.