सोलापूर, दि. ७ : भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती (एसटी) मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीवर माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांची २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी सदस्य म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर पुन्हा एकदा ही जबाबदारी सोपविली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवराज होळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश कार्यकारिणीची नव्याने रचना करण्यात आली.
यामध्ये समाजासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली असून, सोलापूर जिल्ह्यातून राजश्री चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.राजश्री चव्हाण यांनी गेल्या काही वर्षांत आदिवासी पारधी समाजाच्या विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केला आहे. समाजातील वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, सामाजिक न्यायासाठी प्रयत्न करणे तसेच जुळे सोलापूर परिसरातील नागरी समस्यांबाबत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणे, अशा विविध कामांमुळे त्यांची दखल पक्ष नेतृत्वाने घेतल्याचे सांगितले जात आहे.पुनर्नियुक्तीनंतर आदिवासी समाजासह सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध प्रश्नांना अधिक प्रभावीपणे शासन स्तरावर मांडून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भावना राजश्री चव्हाण यांनी व्यक्त केली.दरम्यान, त्यांच्या पुनर्नियुक्तीबद्दल भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आदिवासी पारधी समाजातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे.