सोलापूर, दि. ७ : सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ मध्ये कचरा संकलनाच्या समस्येमुळे नागरिकांना अनेक दिवसांपासून अडचणींचा सामना करावा लागत होता. घंटागाड्या नियमित येत नसल्याने परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले होते. या समस्येची गंभीर दखल घेत नगरसेवक दीपक जमादार यांनी महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्याला अखेर आज यश मिळत प्रभाग क्रमांक २६ साठी दोन नव्या घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे परिसरातील कचरा संकलनाची व्यवस्था अधिक सक्षम होणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्या घंटागाड्यांच्या स्वागतासाठी ओम गर्जन चौकात पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी नगरसेवक दीपक जमादार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी दीपक जमादार यांनी प्रभागातील नागरी सुविधांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, अशी ग्वाही दिली. प्रभागात नियमित व प्रभावी कचरा संकलन व्यवस्था उभारण्यासाठी महानगरपालिकेच्या सहकार्याने आणखी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“दीपक जमादार यांच्यासारखा जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने झटणारा, प्रत्येक अडचण स्वतःची समजून पाठपुरावा करणारा नगरसेवक आम्हाला लाभला, हे आम्ही आमचे मोठे भाग्य समजतो. प्रभागातील कचरा व्यवस्थेचा प्रश्न असो किंवा इतर नागरी सुविधा, त्यांनी नेहमीच नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. दोन घंटागाड्या उपलब्ध करून देत त्यांनी पुन्हा एकदा कामातून आपली बांधिलकी सिद्ध केली. अशाच लोकप्रतिनिधीमुळे नागरिकांचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होतो.” श्याम धुरी ; ट्रस्टी अध्यक्ष ओम गर्जना गणेश उत्सव मंडळ