No Result
View All Result
सोलापूर : रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पिशवीतील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या महिला टोळीचा सदर बझार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पर्दाफाश केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांत तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी चार महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल २ लाख ४० हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
सात रस्ता ते सोरेगावदरम्यान रिक्षातून प्रवास करत असलेल्या काशिबाई कमलाकर पाटील (वय ४५, रा. स्वागत नगर, सोलापूर) यांच्या पिशवीतून सोन्याची बोरमाळ आणि मणीमंगळसूत्र चोरीला गेले होते. ३ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कंबर तलाव परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी ५ ऑगस्ट रोजी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे आणि पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. परिसरातील हालचालींची माहिती घेत तसेच गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित महिलांचा माग काढण्यात आला.
तपासा दरम्यान ममता भोसले, पद्मिनी काळे, सुषमा चव्हाण आणि शैला पवार या चार महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. रिक्षाप्रवासात महिलांच्या मौल्यवान वस्तूंवर नजर ठेवून चोरी करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पोलिसांच्या तत्पर कारवाईचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही कौतुक करण्यात आले.
महिलांनी सावध राहण्याचे आवाहन
रिक्षा किंवा सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करताना महिलांनी पिशव्या व मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात. अनोळखी व्यक्तींकडून होणाऱ्या संशयास्पद हालचालींकडे लक्ष द्यावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
No Result
View All Result