No Result
View All Result
सोलापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायतींमधील जुने व जीर्ण झालेले जन्म-मृत्यू नोंदवहीसह महत्त्वाचे दप्तर स्कॅनिंग करून डिजिटल स्वरूपात जतन करावे, जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि जिल्हा परिषदेतील रिक्त अधिकारी-कर्मचारी पदे तातडीने भरावीत, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने यांनी सर्वसाधारण सभेत केली.जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील जनरल रजिस्टर, अंगणवाडीतील जन्मनोंद रजिस्टर तसेच ग्रामपंचायतींमधील जन्म-मृत्यू नोंद वह्या अनेक वर्षांपासून वापरात असल्याने जीर्ण झाल्या आहेत.
जुन्या नोंदींचा उपयोग जात प्रमाणपत्र, जात पडताळणी तसेच अन्य शासकीय कामांसाठी होत असतो. मात्र, रजिस्टर जीर्ण झाल्याने नोंदी शोधताना पाने फाटण्याचे प्रकार घडत असून नागरिकांना आवश्यक पुरावे मिळण्यात अडचणी येत आहेत.महसूल विभागाने जुन्या रेकॉर्डचे स्कॅनिंग करून ते डिजिटल स्वरूपात जतन केले आहे. त्याच धर्तीवर जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायतींमधील जुन्या नोंदवह्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे स्कॅनिंग करावे. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माने यांनी केली. यावेळी त्यांनी काही शाळांमधील जीर्ण रजिस्टरची अवस्था अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा ; अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील उर्दू शाळेच्या व्हरांड्याचा स्लॅब कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाल्याच्या घटनेचा संदर्भ देत माने यांनी जिल्ह्यातील शासकीय इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला.जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींसह अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय केंद्र, सभामंडप, समाजमंदिर, अभ्यासिका आदी शासकीय निधीतून बांधलेल्या सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. गाव, वाडी-वस्ती आणि तांड्यांवरील शासकीय इमारतींची तपासणी करून धोकादायक इमारतींबाबत विभागनिहाय अहवाल तयार करावा आणि त्यावर तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
रिक्त पदांमुळे प्रशासनावर ताण : सोलापूर जिल्हा परिषद प्रशासन विविध शासन अभियान व उपक्रमांमध्ये आघाडीवर असल्याचे कौतुक करता नाच रिक्त अधिकारी-कर्मचारी पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याकडे माने यांनी लक्ष वेधले.जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन), कार्यकारी अभियंता बांधकाम-२, ग्रामीण पाणीपुरवठा, लघु पाटबंधारे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, समाजकल्याण अधिकारी, शिक्षणाधिकारी (योजना) आणि दिव्यांग अधिकारी यांसह प्रमुख पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर विविध विभागांमध्ये कर्मचारी पदेही रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. ही पदे तातडीने भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करावा, अशी मागणी माने यांनी केली.सर्वसाधारण सभेत माने यांनी विविध विषयांवरील चर्चेत सहभाग घेत प्रशासनाने नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
No Result
View All Result