सोलापूर : श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली. याचवेळी सोलापूरच्या राजकारणात लक्षवेधी ठरणारे चित्र पाहायला मिळाले. ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी एकत्रितपणे श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेतले. त्यामुळे दोन्ही देशमुखांच्या या एकत्रित उपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
या दर्शनावेळी दोन्ही नेत्यांचे समर्थक कार्यकर्ते तसेच नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सोमनाथ केंगनाळकर, माजी सभागृह नेते तथा नगरसेवक शिवानंद पाटील, विधी सभापती सत्यजित वाघमोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दोन देशमुख, एकच व्यासपीठ आणि समर्थकांची गर्दी, यामुळे या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. सोलापूर भाजपच्या राजकारणात अनेक कार्यक्रमांमध्ये दोन्ही देशमुख एकत्र दिसत असून, २०२४च्या विधानसभा निवडणुकीनंतर हे चित्र अधिक ठळकपणे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे सोलापूर शहर-जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाची सूत्रे असल्याने, भाजपमधील जुन्या-जाणत्या नेत्यांच्या भूमिकेकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सिद्धरामेश्वरांच्या चरणी एकत्र आलेले दोन देशमुख आगामी काळात राजकारणातही एकत्रित भूमिका घेणार का? हा प्रश्न आता सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे