सोलापूर : (ता.उत्तर सोलापूर ) येथील पेठेतील मारुती मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त शुक्रवार (दि. २१) ते गुरुवार (दि. २७) ऑगस्टदरम्यान श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील प्रख्यात भागवत कथाकार पुराणचूडामणी ह.भ.प. सुदर्शन महाराज (बेलापूरकर) कथा निरूपण करणार आहेत.
ही माहिती श्री नागनाथ देवस्थानचे खर्गे नागेश स्वामी महाराज व श्री यमाईदेवीचे आद्य भक्त श्री रंगनाथ स्वामी मोकाशी यांचे विद्यमान वंशज ज्योतिषाचार्य रेणुकादास मोकाशी यांनी दिली.सुदर्शन महाराज यांचे वारकरी संप्रदायाचे शिक्षण आळंदी येथील संत सावता माळी वारकरी शिक्षण संस्थेत गुरुवर्य ज्ञानेश्वर गवळी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
त्यानंतर नांदेड येथील श्री दुर्गा वेदपाठशाळेत त्यांनी १२ वर्षे वैदिक शिक्षण घेतले. पुण्याच्या वेदशास्त्रोत्तेजक सभेने त्यांना ‘पुराणचूडामणी’ पदवीने गौरविले आहे.शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता श्रीमद्भागवत ग्रंथ व महाराजांची दिंडी मिरवणुकीने मारुती मंदिरात आगमन होईल. दररोज सायंकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत कथा होईल. यामध्ये परीक्षित जन्म, ध्रुव चरित्र, प्रल्हाद चरित्र, कृष्ण जन्म, गोवर्धन लीला, कंसवध, कृष्ण-रुक्मिणी विवाह, सुदाम चरित्र आदी विषयांचे निरूपण होणार आहे. गुरुवारी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सांगता होईल. भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.