सोलापूर : भारतीय जनता पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक उद्या (गुरुवारी) सोलापुरात होणार असून, या बैठकीसाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. हॉटेल बालाजी सरोवर येथे सकाळी ११ वाजता होणाऱ्या या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील खासदार, आमदार आणि जिल्हाध्यक्षांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
बैठकीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील १६ जिल्हाध्यक्षांसह कोअर कमिटीचे सदस्य, खासदार आणि आमदार सोलापुरात दाखल झाले आहेत. बाहेरून येणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांकडून विविध पातळ्यांवर नियोजन पूर्ण करण्यात आले आहे.गुरुवारी सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या बैठकीस पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे सुमारे २७० प्रमुख नेते व कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. आगामीराजकीय आणि संघटनात्मक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.सकाळच्या सत्रात आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची व्यूहरचना, मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षणाचा (एसआयआर) आढावा तसेच पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर सविस्तर चर्चा होणार आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याबाबतही या बैठकीत दिशा ठरविली जाण्याची शक्यता आहे.
सकाळचे सत्र दुपारी दोन वाजेपर्यंत चालणार आहे.दुपारी अडीच वाजल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष-उपाध्यक्ष व विविध पदाधिकारी, तसेच महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर, पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्याशी भाजपचे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नेते संवाद साधणार आहेत.या संवादातून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षाची स्थिती, आगामी निवडणुकांची तयारी, संघटनात्मक कामकाज आणि स्थानिक पातळीवरील प्रश्नांचा आढावा घेतला जाणार असल्याचे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी सांगितले.