शब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना
सोलापूर : गेल्या ३४ वर्षांपासून मोची समाजाकडून होत असलेल्या शैक्षणिक कामासाठी भूखंड मिळण्याच्या मागणीला अखेर यश आले आहे. आमदार देवेंद्र कोठे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीत ही मागणी मंजूर करण्यात आली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेषतः लष्कर आणि परिसरात प्रामुख्याने असलेल्या मोची समाजाच्या गोरगरीब कामगारांच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी याकरिता श्री जांबमुनी मोची समाजसेवा मंडळाला येथील जागा शाळेकरीता द्यावी अशी मागणी समाजाच्यावतीने आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे करण्यात आली होती.

त्यांची ही मागणी विचारात घेऊन आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. आमदार देवेंद्र फडणीस यांच्या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळे यांनी श्री जांबमुनी मोची समाजसेवा मंडळाला ही जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.यापूर्वी हा भूखंड मिळवण्यासाठी मोची समाजातील अनेकांनी तत्कालीन आमदार, खासदार, मुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती. परंतु हा प्रश्न सुटला नव्हता. आमदार देवेंद्र कोठे यांनी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मांडल्यानंतर मात्र या विषयाला गती आली.सोलापूर उत्तर सदर बझार येथील माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेली ३ हजार ९१० चौ.मी. जागा श्री जांबमुनी मोची समाज सेवा मंडळाला शैक्षणिक कारणासाठी २३४६ चौरस मीटर क्षेत्र प्रचलित बाजारमूल्याच्या वीस टक्के रक्कम घेऊन कब्जे हक्काने देण्याचा निर्णय घेण्यात आला. क्रीडांगणासाठी १५४६ चौरस मीटर क्षेत्र वर्षाला एक रुपया नाममात्र दराने तीस वर्षासाठी भाडेपट्ट्याने देण्यास मान्यता देण्यात आली.मात्र हा भूखंड़ देताना राज्य शासनाने काही अटी आणि शर्तीही घातल्या आहेत. या जमिनीचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठीच करता येणार आहे. जमिनीचा ताबा मिळाल्यापासून तीन वर्षांच्या आत मंजूर प्रयोजनासाठी वापर सुरू करणे बंधनकारक आहे.











