सोलापूर, . उत्तर सोलापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्डी येथील पर्णकुटी ते यमाई मंदिर या सुमारे दीड किलोमीटर रस्त्याचा रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांमुळे खराब झालेल्या या रस्त्याचे आता सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार असून, यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन गुरुवारी (दि. २०) भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
श्रीक्षेत्र मार्डी येथील यमाई देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक येत असतात. मात्र, पर्णकुटी ते यमाई मंदिर या मार्गाची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाल्याने भाविकांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांची कसरत होत होती. पावसाळ्यात या मार्गावर चिखल आणि पाणी साचल्याने वाहतुकीच्या अडचणींमध्ये आणखी भर पडत होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निधीतील ३५४ अंतर्गत तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे १.५ कोटी रुपयांचा निधी मागील काही महिन्यांत मंजूर करण्यात आला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले. निधी मंजूर झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत असल्याने भाविक आणि ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर यमाई मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार असून, परिसरातील नागरिकांचीही दळणवळणाची समस्या दूर होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर होणारा चिखल, खड्ड्यांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी आणि वाहनांचे होणारे नुकसान यावरही कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. मंदिर परिसराच्या दृष्टीनेही हा रस्ता महत्त्वाचा असल्याने भाविकांच्या सोयीसाठी या कामाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
भूमिपूजनप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, सभापती तेजस्विनी बोराडे, सरपंच प्रांजली पवार, कमलाकर माने, बाळासाहेब पाटील, पोपट कापसे, पृथ्वीराज माने, युवा मंच सचिव तात्यासाहेब कदम, युवराज पवार, काशिनाथ कदम, ज्ञानेश्वर मुडके, अझहर शेख, अमोल बोराडे, ग्रामपंचायत अधिकारी नंदकुमार पाटील उपस्थित होते. तसेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजी सोनार, रंगनाथ गुरव, नागनाथ जगताप, संजय इनामदार, कंदील कुडले, प्रभाकर फुलसागर, अरुण मुडके, अशोक इनामदार, हमीद कुडले यांच्यासह ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.