सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील महिला, मुली व विद्यार्थिनींच्या शैक्षणिक, आरोग्यविषयक, कौशल्यविकास व रोजगाराभिमुख विकासाच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.शहरातील महिला व मुलींसाठी MS-CIT प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून, या प्रशिक्षणासाठी दि. २१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
तसेच सोमपा प्रसूतिगृह, मनपा माध्यमिक शाळा व महानगरपालिका इमारत येथे सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वॉटर प्युरिफायर बसविण्याचाही निर्णय घेण्यात आला.सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात पात्र व गरजू महिला व मुलींसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एकल महिला व त्यांच्या मुलींना तसेच सन २०२५-२६ मध्ये इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्या १८ ते २५ वयोगटातील मुलींना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.मनपा प्राथमिक शाळांमधील इयत्ता चौथी व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क भरण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. तसेच मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक त्या मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समितीच्या सर्व सदस्यांनी मनपा शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करण्याचा निर्णय घेतला.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निर्मला हरी जंगम यांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील महिला व मुलींसाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्यविकास व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिलांना स्वावलंबी करण्याबरोबरच मुलींच्या शिक्षणाला व सुरक्षिततेला प्राधान्य देऊन आगामी काळातही विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील.बैठकीस समितीच्या सदस्या सुनीता सुनील, तोडकरी मंदाकिनी सुरेश, गायगवाड वंदना अजित, गवळी मुन्नाभाई महादेव, पूजा श्रीकांत डोंगरे, श्वेता प्रशांत खरत (बोडके), सुमन अजित, गायकवाड मुमताज, चौधरी सफिया मोहम्मद शफीक तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.
महिला-बालकल्याण समितीचे पाच महत्त्वाचे निर्णय










