सोलापूर : घराच्या उंबरठ्याबाहेर पडून लेक जेव्हा महाविद्यालयात प्रवेश करते; तेव्हा तिच्या आयुष्यात शिक्षणासोबतच नव्या विचारांचे, नव्या संधींचे आणि नव्या स्वप्नांचे एक स्वतंत्र विश्व आकार घेत असते. त्या विश्वाची आईला जवळून ओळख व्हावी, लेकीच्या शैक्षणिक प्रवासातील तिचा सहभाग अधिक अर्थपूर्ण व्हावा या संवेदनशील संकल्पनेतून सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात ‘आई माझ्या कॉलेजमध्ये’ हा अभिनव पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. आई, लेक आणि शिक्षक यांना संवादाच्या एका व्यासपीठावर आणून विश्वासाचा अनुबंध जोडणारा हा उपक्रम भावस्पर्शी अनुभव ठरला.
यावेळी पालकांशी संवाद साधताना प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांनी बदलत्या शिक्षणव्यवस्थेत पालकांच्या भूमिकेवर भाष्य केले. ते म्हणाले की, पालक म्हणून आपण मुलीच्या भविष्याची काळजी घेतो. मात्र तिचे भविष्य आपण ठरविण्यापेक्षा स्वतःचे भविष्य निवडण्याची क्षमता तिच्यात निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे. स्वतःच्या पायावर उभे राहता येणे, हे शिक्षणाचे खरे यश आहे. या प्रवासात महाविद्यालयाइतकीच कुटुंबाची आणि विशेषतः आईची भूमिका महत्त्वाची आहे.
पालकांनी त्यांच्या मनोगतातून मुलगी ज्या परिसरात शिकते, अभ्यासाबरोबर तिच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी कोणते उपक्रम राबविले जातात आणि भविष्यातील करिअरसाठी तिला कशाप्रकारे तयार केले जाते, याची जवळून ओळख झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शिक्षकांशी झालेल्या संवादामुळे मुलींच्या क्षमता आणि त्यांच्या भविष्यातील संधींकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. इंदुमती गंगन्नवर यांनी केले. तर प्रा. हरीश हाके यांनी आभार मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. किशोर पवार, डॉ. संतोष मारकवाड, डॉ. अशोक भोंग, प्रा. राजेश्री कवीश्वर उपस्थित होते.
गुणपत्रिकेवरील आकड्यांसोबतच खऱ्या ‘गुणवत्ते’चाही शोध घ्या ; विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष वेधताना प्राचार्य डॉ. ढेरे म्हणाले, प्रत्येक विद्यार्थिनीमध्ये स्वतंत्र क्षमता आणि उपजत कलागुण असतात. त्यामुळे त्यांचे मूल्यमापन केवळ गुणपत्रिकेतील आकड्यांवर करू नका. एखादी विद्यार्थिनी अभ्यासात उत्तम असेल, तर दुसरी कला, क्रीडा, तंत्रज्ञान, संवाद, नेतृत्व किंवा उद्योजकतेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू शकते. गुणपत्रिका तिच्या शैक्षणिक प्रगतीची नोंद सांगते. पण तिच्यातील खरे ‘गुण’ तिचे भविष्य घडवतात. ते ओळखण्याची जबाबदारी शिक्षकांइतकीच पालकांचीही आहे.