सोलापूर : जुळे सोलापूर परिसरातील सेंचुरी फिटनेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सेंचुरी प्रीमियर लीग (CPL) क्रिकेट स्पर्धेच्या द्वितीय पर्वाचा शुभारंभ महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला. उद्घाटन सोहळ्याला खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि आयोजकांची मोठी उपस्थिती होती. सेंचुरी फिटनेसच्या ओनर डॉ. दिव्या सलगर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे परिसरातील क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त मैदानावर खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.


यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांचा डॉ. दिव्या सलगर आणि भाजपा जिल्हा सचिव अमोल कारंडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास युवा नेते सैफनभाई शेख तसेच सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक समीर सलगर यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनप्रसंगी बोलताना महापौर कोंड्याल यांनी युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. क्रिकेटसारख्या सांघिक खेळातून नेतृत्वगुण, शिस्त, संयम आणि संघभावना विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांनी मैदानाशी नाते जोडत नियमितपणे विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सेंचुरी प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाला मिळालेला प्रतिसाद पाहता स्पर्धेतील आगामी सामने चुरशीचे होण्याची शक्यता आहे. उद्घाटनानंतर विविध संघांमधील सामन्यांना प्रारंभ झाला असून, विजेतेपदासाठी खेळाडूंमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. कार्यक्रमास सेंचुरी फिटनेसचे पदाधिकारी, स्पर्धेचे आयोजक, विविध संघांचे खेळाडू, क्रिकेटप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते











