फोनवरून अधिकाऱ्यांना सूचना; समस्या ऐकताच कार्यवाही सुरू — ‘असा उपमहापौर यापूर्वी पाहिला नाही’, नागरिकांतून कौतुकाचा सूर
सोलापूर : हद्दवाढ भागातील नागरिकांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या नागरी प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या अडचणींचा तातडीने निपटारा व्हावा, यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या कार्यालयात दर मंगळवारी जनता दरबार आयोजित केला जात आहे. या उपक्रमाला हद्दवाढ भागातून मोठा प्रतिसाद मिळत असून, नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना थेट फोन करून सूचना देत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचा प्रयत्न उपमहापौर देवकर करीत आहेत.

हद्दवाढ भागातील नागरिकांना पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पथदिवे तसेच विविध नागरी सुविधांशी संबंधित अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्या घेऊन नागरिक जनता दरबारात येत असून, प्रत्येक तक्रार ऐकून घेण्यासोबतच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधला जात आहे. अनेक वेळा नागरिकांसमोरच फोन करून समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना दिल्या जात असल्याने नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण होत आहे.विशेष म्हणजे, केवळ तक्रारी ऐकून घेण्यापुरता जनता दरबार मर्यादित न ठेवता त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही व्हावी, यासाठी उपमहापौर देवकर स्वतः पाठपुरावा करीत आहेत. नागरिकांनी समस्या मांडल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना देणे आणि प्रश्नाच्या निवारणासाठी पाठपुरावा करण्याची त्यांची कार्यपद्धती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.











