
सोलापूर | सोलापूर शहराच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून रंगभवन परिसरात उभारण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. ऐतिहासिक वारशाची झलक आणि आधुनिक सौंदर्यशास्त्राचा संगम साधणाऱ्या या प्रकल्पामुळे रंगभवन परिसराला नवी ओळख मिळणार आहे.या स्मारकाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठेशाहीच्या वैभवशाली परंपरेची साक्ष देणारे वाडा पद्धतीचे भव्य प्रवेशद्वार. प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच शिवकालीन वास्तुकलेचा अनुभव नागरिकांना घेता येणार असून संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येणार आहे.

स्मारकाच्या मध्यभागी उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा दूरवरूनही लक्ष वेधून घेईल. हिरवळीने नटलेला परिसर, आकर्षक पायवाटा, प्रकाशयोजना आणि ऐतिहासिकतेची जपणूक यामुळे हे ठिकाण सोलापूरच्या पर्यटन नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी दर्जेदार काळ्या दगडाचा वापर करण्यात येणार असून स्मारकाला दीर्घकाळ टिकणारे आणि राजेशाही स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे स्मारक सोलापूरकरांसाठी प्रेरणा, अभिमान आणि ऐतिहासिक स्मृतींचे केंद्र ठरणार आहे.













