सोलापूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत वापरण्यात आलेल्या मतपत्रिका जिल्हा कोषागार कार्यालयात कडक सुरक्षा व्यवस्थेत जतन करण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार या मतपत्रिका पुढील दोन वर्षे सुरक्षित ठेवण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर सर्व मतपत्रिका सीलबंद करून कोषागाराच्या सुरक्षित कक्षात ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षा रक्षक आणि नियमित तपासणीद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे.
निवडणुकीसंदर्भात कोणतीही तक्रार, हरकत किंवा न्यायालयीन प्रक्रिया उद्भवल्यास या मतपत्रिकांचा पुरावा म्हणून उपयोग होऊ शकतो.निर्धारित दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आणि कोणताही वाद प्रलंबित नसल्यास निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतपत्रिकांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.