No Result
View All Result
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या कामात सुमारे ५० लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप समोर आल्याने महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी हा आरोप करत, कागदोपत्री रात्रभर नालेसफाई सुरू असल्याचे दाखवून प्रत्यक्षात कामच न झाल्याचा दावा केला आहे. या आरोपांची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले आणि गटारींची साफसफाई करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र, यंदाच्या मोहिमेत पोकलेन मशीनच्या वाहतुकीच्या नावाखाली मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. जाधव यांच्या म्हणण्यानुसार, एकाच पोकलेन मशीनची रोज वाहतूक झाल्याचे दाखवून लाखो रुपयांची बिले काढण्यात आली. प्रत्यक्षात संबंधित मशीन अनेक दिवस एकाच ठिकाणी उभी होती. रात्री काम सुरू असल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी मशीनजवळ केवळ प्रकाशयोजना करण्यात आली, मात्र नालेसफाईचे काम झालेच नाही, असा त्यांचा आरोप आहे.
माहिती अधिकारातून मिळालेल्या नोंदींमध्ये काही ठिकाणी नालेसफाई सलग ७, ८, १२, १५ आणि २२ तास सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, आदिला नदीचा अपवाद वगळता शहरातील इतर कोणत्याही नाल्यावर रात्री प्रत्यक्ष काम झाल्याचे दिसून येत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे कामाच्या नोंदी आणि प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये मोठी तफावत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी चौकशीचे आदेश देत वाहतूक खर्चाच्या बिलांमधील तफावत तपासून संबंधितांकडून रक्कम वसूल करण्याचे निर्देश निविदा व सनियंत्रण समितीला दिले आहेत. नगरसेवक अनंत जाधव यांनी केवळ विभागीय चौकशीवर न थांबता संबंधित अधिकारी आणि मक्तेदारांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून संपूर्ण रक्कम वसूल करावी, अशी मागणी केली आहे. हा विषय महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत तातडीचा विषय म्हणून मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
No Result
View All Result