सोलापूर : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता जून-जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पुनर्परीक्षार्थी तसेच खासगी विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज भरावेत, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी आणि जून-जुलै २०२६ परीक्षेसाठी नावनोंदणी केलेले खासगी विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करू शकतात. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर परीक्षा अर्ज भरावेत.

परीक्षेसाठी ५ मे ते १५ मे या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज स्वीकारले जाणार असून, १६ मे ते २० मे दरम्यान विलंब शुल्कासह अर्ज सादर करता येणार आहेत. सर्व अर्ज ऑनलाइन भरून सबमिट केल्यानंतर संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगिनद्वारे प्री-लिस्ट उपलब्ध करून दिली जाणार आहे.
दरम्यान, फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमानुसार जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ आणि जून-जुलै २०२७ अशा सलग तीन परीक्षांच्या संधी उपलब्ध राहणार असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज भरून परीक्षेची संधी गमावू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

“बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याची अंतिम मुदत लक्षात घेऊन वेळेत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे व माहिती अचूक भरावी. श्रेणीसुधार व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा आणि कोणताही विद्यार्थी केवळ मुदत चुकल्यामुळे परीक्षेपासून वंचित राहू नये,” असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केले आहे











