सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याच्या मुदतीत राज्य शासनाने १० ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला असून, अद्याप पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

सोलापूर जिल्ह्यात जुलैअखेरपर्यंत केवळ १ लाख ५८ हजार ३२८ शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा भरला आहे. यंदा विविध जाचक अटी, सर्व्हरच्या तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता आणि ऑनलाइन प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे अनेक शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहिले. त्यामुळे यंदा पीक विम्याबाबत शेतकऱ्यांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याचे दिसून येत आहे. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर किंवा दुष्काळामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्त्वाची मानली जाते. मात्र, गेल्या वर्षी नुकसानभरपाईच्या प्रक्रियेबाबत तसेच काही पिकांबाबत निर्माण झालेल्या नाराजीचाही परिणाम यंदाच्या प्रतिसादावर झाल्याचे बोलले जात आहे.

राज्य शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे आता जिल्ह्यातील उर्वरित पेरणी केलेल्या सर्व पात्र पिकांचा विमा भरण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना १० ऑगस्टची अंतिम मुदत येण्याची वाट न पाहता तातडीने पीक विमा भरावा, असे आवाहन केले आहे. त्यामुळे कोणत्याही संभाव्य नैसर्गिक संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळण्यास मदत होणार आहे.












