सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर्स कारखान्याकडे तब्बल १३० कोटी रुपयांचे ऊस बिल थकीत असल्याने सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. थकीत रकमेच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन आठव्या दिवशीही सुरू असून, शासन आणि कारखाना प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्याने शेतकऱ्यांनी ४ जून रोजी अर्धनग्न धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
शेतकरी संघटना तुळजापूर, अक्कलकोट तसेच गोकुळ शुगर्सचे थकीत ऊस बिल उत्पादक शेतकरी यांच्या वतीने दिलेल्या निवेदनानुसार, गुरुवारी सकाळी पूनम गेट ते सहप्रादेशिक साखर विभाग कार्यालय (कन्ना चौक) दरम्यान अर्धनग्न मोर्चा काढण्यात येणार आहे.शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, साखर आयुक्त, पुणे यांनी १५ मे रोजी कारखान्याविरोधात आरआरसी कारवाईचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी कारवाई होताना दिसत नाही.
त्यामुळे थकीत ऊस बिलासह व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.निवेदनात असा आरोप करण्यात आला आहे की, गोकुळ शुगर्सने २०२५-२६ हंगामासाठी आवश्यक गाळप परवाना न घेताच ऊस गाळप केले. तसेच संबंधित विभागाने या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने कारखान्यावर अद्याप कोणतीही कठोर प्रशासकीय किंवा फौजदारी कारवाई झालेली नाही.थकीत बिलाच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे.