सोलापूर : श्री स्वामी समर्थ शासकीय व जिल्हा परिषद शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूर या संस्थेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी नूतन संचालक मंडळाची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या चेअरमनपदी अंकुश कुंभार यांची, तर संचालकपदी प्रकाश सुतार यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यासह सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे व संचालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
या नूतन संचालक मंडळात व्हाईस चेअरमनपदी अनिल जगताप यांची निवड झाली आहे. तर रामचंद्र म्हमाणे, राजकुमार जाधव, गंगाधर कांबळे, दत्तात्रय चौगुले, भरत माळवदकर, महामुनी गायकवाड आणि नवनाथ जगताप यांची संचालकपदी निवड करण्यात आली आहे. तसेच महिला संचालिका म्हणून मनिषा जमदाडे, स्वाती चोपडे आणि वर्षा खराडे यांची निवड झाली आहे. संस्थेच्या सचिवपदी पुंडलिक नवले यांची निवड करण्यात आली आहे.
शासकीय व जिल्हा परिषद शिक्षक तसेच सेवकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहकारी पतसंस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते. सभासदांचे आर्थिक हित जपणे, संस्थेचा कारभार पारदर्शक ठेवणे, बचतीला प्रोत्साहन देणे आणि गरजू सभासदांना आर्थिक आधार उपलब्ध करून देणे, या बाबींना विशेष महत्त्व आहे. नूतन चेअरमन अंकुश कुंभार, संचालक प्रकाश सुतार यांच्यासह सर्व संचालक मंडळाकडून सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील आणि संस्थेच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
संस्थेच्या आगामी पाच वर्षांच्या वाटचालीत नूतन संचालक मंडळासमोर सभासदांचा विश्वास अधिक दृढ करण्याबरोबरच संस्थेची आर्थिक शिस्त, विश्वासार्हता आणि सभासदाभिमुख कामकाज कायम राखण्याचे महत्त्वपूर्ण आव्हान असणार आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे व संचालकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.