सोलापूर : जिल्ह्यात खरीप हंगाम 2026 साठी कृषी विभागाने 4 लाख 99 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केलेले आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणी क्षेत्रात वाढ दिसत आहे. तरी कृषी व संबंधित विभागांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खते व बियाणे मुबलक प्रमाणात व वेळेवर उपलब्ध करावेत, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. नियोजन भवन येथे आयोजित खरीप हंगाम 2026 आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, विभागीय कृषी सह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या सह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले की, खते पुरवठा करणाऱ्या कंपन्या तसेच बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून कृषी विभागाने वेळेतच खते व बियाणे उपलब्ध करून घ्यावेत तसेच विक्रेत्यामार्फत विनालिंकिंग शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावेत. जे निविष्ठा विक्रेते लिंकिंग करून शेतकऱ्यांना बोगस खते व बियाणे विकत असतील अशा विरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करावी. यामध्ये लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी अत्यंत संवेदनशील होऊन काम करावे व लिंकिंग होऊ देऊ नये. पोलीस विभागाने यासंबंधी तक्रारी प्राप्त झाल्यावर त्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून घ्यावेत, असेही त्यांनी निर्देशित केले.
मागील वर्षी अतिवृष्टी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळालेले अनुदान तात्काळ वाटप झाले पाहिजे. शेतकऱ्यांची एकदा इ केवायसी झाल्यानंतर पुन्हा पुन्हा ई केवायसी करू नये व संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान वितरित करावे. ही केवायसी अनुषंगाने मंत्रिमंडळाने पुनर्वसन सचिवांना याबाबत सविस्तर सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने प्रशासनाने अनुदान वितरण करणे अनिवार्य असल्याचे पालकमंत्री श्री. गोरे यांनी सुचित केले.


जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेत जमिनीचे माती परीक्षण करून घेण्याबाबत लोकप्रतिनिधी तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रबोधन करावे. तसेच जिल्ह्याला एकच माती परीक्षण लॅब आहे. तरी यापुढील काळात प्रत्येक तालुक्याला माती परीक्षण लॅब असावी याबाबत प्रयत्न करणार असल्याचे श्री गोरे यांनी सांगून कृषी विभागाने फळबाग लागवडीत चांगले काम करावे यासाठी मागील वर्षीपेक्षा यावर्षी फळबाग लागवडीचे उद्दिष्ट दुप्पट करावे व प्रत्येक तालुका कृषी अधिकाऱ्यांना उद्दिष्ट ठरवून देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.












