आयव्हीएफ केंद्र, डॉक्टरांचे मानधन अन् कामगार आंदोलनावर चर्चा; सत्यनारायण बोल्ली यांची पुन्हा प्रेसिडेंटपदी निवड
सोलापूर, . श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या ६० व्या सर्वसाधारण सभेत रुग्णालयाच्या कारभारासह आयव्हीएफ उपचार केंद्र, डॉक्टरांचे मानधन, पोटनियम दुरुस्ती आणि कामगारांच्या आंदोलनासह विविध विषयांवर सभासदांनी प्रश्न उपस्थित केले. रुग्णालयाच्या कामकाजात आवश्यक सुधारणा करून कारभाराकडे जातीने लक्ष देण्यात येईल, अशी ग्वाही प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांनी दिली. दरम्यान, पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी बोल्ली यांची पुन्हा प्रेसिडेंटपदी फेरनिवड करण्यात आली.
सभेत आयव्हीएफ उपचार केंद्राचा मुद्दा चर्चेत आला. आयव्हीएफ उपचारासाठी डॉ. अमेय माणिक गुर्रम यांच्या निवडीबाबत तसेच त्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनाबाबत काही सभासदांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांना देण्यात येणारे मानधन बंद करून अन्य डॉक्टरांप्रमाणे कमिशन बेसवर नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी सभासदांनी केली. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अमित पोरेडी यांच्या कायमस्वरूपी मानधनाचा मुद्दाही सभासदांनी उपस्थित केला. याबाबत चेअरमन, डॉ. विजयकुमार अरकाल व अन्य संचालकांसोबत बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन बोल्ली यांनी दिले. याशिवाय पोटनियम दुरुस्ती आणि कामगारांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरही सभेत चर्चा झाली.
सर्वसाधारण सभेनंतर प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयातील एका कक्षात बैठक घेण्यात आली. या बैठकीत रामकृष्ण कोंड्याल, सुरेश फलमारी, काशिनाथ गड्डम, अमृतदत्त चिन्नी, व्यंकटेश दोंता, श्रीधर चिट्याल, रमेश कैरमकोंडा, हरिदास पोटाबत्ती, ॲड. श्रीनिवास क्यातम, किसन श्रीराम, ॲड. प्रकाश जन्नू आदींनी रुग्णालयाच्या कारभाराशी संबंधित विविध प्रश्न मांडले. त्यावर प्रत्येक प्रश्नाचा गांभीर्याने विचार करून रुग्णालयाच्या कामकाजाकडे जातीने लक्ष देण्याचे आश्वासन बोल्ली यांनी दिले.
जनआरोग्य योजनेची माहिती दर्शनी भागात लावा
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना योजनेची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी तळमजल्यावर तसेच रुग्णालयाच्या दर्शनी भागात माहितीफलक लावण्याची मागणी सभासदांनी केली. त्यावर योजनेची माहिती नागरिकांना सहज दिसेल अशा ठिकाणी लावण्यात येईल, असे बोल्ली यांनी स्पष्ट केले.
बोल्लींकडे पुन्हा पाच वर्षांची धुरा
श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी सत्यनारायण बोल्ली यांची पुन्हा प्रेसिडेंटपदी निवड करण्यात आली. निवडीनंतर महापौर विनायक कोंड्याल, चेअरमन डॉ. माणिक गुर्रम, व्हाईस चेअरमन राजेशम येमूल तसेच पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त रामकृष्ण कोंड्याल, मुरलीधर अरकाल आदींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.