सोलापूर : राष्ट्रीय महामार्ग 465 अंतर्गत मोहोळ–बसवनगर–तेरा मैल–वळसंग या 81.37 किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल 740 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाल्यानंतर सोलापूरच्या राजकारणात श्रेयवादाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. विकासाच्या या महत्त्वाच्या निर्णयावर सर्वच राजकीय नेते आपापला वाटा असल्याचा दावा करत मैदानात उतरल्याने “खरं श्रेय कुणाचं?” हा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असतानाच, स्थानिक पातळीवर मात्र श्रेय घेण्याची स्पर्धा चांगलीच रंगली आहे.सर्वप्रथम अक्कलकोट मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पुढाकार घेत गडकरी यांचे आभार मानले. त्यांनी या रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल, शेतमाल वाहतुकीला गती मिळेल आणि जिल्ह्याच्या व्यापार-उद्योगाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.यानंतर लगेच खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकल्पासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केल्याचा दावा करत गडकरी यांना दिलेल्या निवेदनाचे पुरावे आणि भेटीचे फोटो माध्यमांसमोर मांडले.
डिसेंबर 2025 पासून या विषयावर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यालयाकडूनही या प्रकल्पासाठी आभार व्यक्त करत विकासकामांची सविस्तर माहिती देण्यात आली. संजवाड येथे सीना नदीवरील मोठा पूल, आहेरवाडी फाटा येथे रेल्वे उड्डाणपूल (ROB) आणि विविध लहान पूल व निचरा कामांचा समावेश या प्रकल्पात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या सर्व घडामोडींमुळे सोलापुरात “दादा, ताई की बापू?” असा राजकीय प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रत्यक्षात केंद्र सरकारच्या मंजुरीशिवाय हा प्रकल्प शक्य नसला, तरी स्थानिक पातळीवरील पाठपुरावा आणि राजकीय इच्छाशक्ती याचाही वाटा असल्याचे मत व्यक्त होत आहे.दरम्यान, नागरिक मात्र या श्रेयवादाकडे वेगळ्याच नजरेने पाहत आहेत. “कोणाचेही श्रेय असो, रस्ता लवकर पूर्ण व्हावा आणि विकास घडावा,” अशी अपेक्षा सामान्य सोलापूरकर व्यक्त करत आहेत.










