सोलापूर : महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उद्या सोलापूर दौऱ्यावर येत असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळा’ संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून सोलापूर पुण्यनगरी आपल्या ‘देवाभाऊंच्या’ स्वागतासाठी सज्ज झाली आहे.हा मेळावा केवळ राजकीय नसून सोलापूरच्या सर्वांगीण विकासाचा कृतज्ञता सोहळा ठरणार आहे. फडणवीस सरकारच्या माध्यमातून सोलापूरसाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प मंजूर झाले आहेत, ज्यांचा प्रामुख्याने उल्लेख या दौऱ्यात केला जाईल.

या कार्यक्रमाचे आयोजन आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या वतीने करण्यात आले आहे. शहराच्या मुख्य चौकांमध्ये स्वागताचे फलक लावण्यात आले असून, कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. हरिभाऊ देवकरण प्रशालेच्या मैदानावर भव्य व्यासपीठ आणि हजारो नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था पूर्ण झाली आहे.

दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. हरिभाई देवकरण प्रशाला परिसरात पार्किंग आणि वाहतूक नियोजनासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत.या विजयी मेळाव्यास सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी व आमदार देवेंद्र कोठे यांच्या वतीने करण्यात आले आहे.











